Saturday, September 5, 2026
HomeDhanoraजपतलाई दुर्घटनेनंतर आश्रमशाळांच्या सुरक्षेसाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये...

जपतलाई दुर्घटनेनंतर आश्रमशाळांच्या सुरक्षेसाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

जपतलाईतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची गंभीर दखल,

दोषींवर कठोर कारवाईचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचे निर्देश,

गडचिरोली /धानोरा,१२ ऑगस्ट २०२६::- धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूची गंभीर दखल घेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आश्रमशाळांच्या सुरक्षेबाबत कठोर भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसून, दुर्घटनेतील निष्काळजीपणासाठी जबाबदार संस्थाचालक व संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, तसेच आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मंत्री डॉ. उईके यांनी बुधवारी जपतलाई आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट देऊन घटनास्थळासह संपूर्ण परिसराची पाहणी केली. विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, अंथरुण-पांघरुण, गाद्या, पिण्याचे पाणी, भोजन, स्वयंपाकगृह, स्वच्छता आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.

१५ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था :-

जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची १५ ऑगस्टपर्यंत सुरक्षित ठिकाणी शैक्षणिक व निवासी व्यवस्था करण्याचे निर्देश मंत्री उईके यांनी दिले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांना दर्जेदार शिक्षणासह आवश्यक निवासी सुविधा मिळाव्यात, याची दक्षता घेण्यास त्यांनी प्रशासनाला सांगितले.

राज्यातील ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट :-

जपतलाई घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांची पुढील तीन महिन्यांत तृतीय पक्षीय तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तपासणीत इमारतीची सुरक्षितता, निवास व्यवस्था, बेड-गाद्या, शुद्ध पिण्याचे पाणी, भोजनाचा दर्जा, स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेसह साप, विंचू, डास व अन्य कीटकांपासून विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची तपासणी केली जाणार आहे.

सर्व आश्रमशाळांची वर्षातून किमान दोन वेळा प्रत्यक्ष तपासणी करून त्याचे छायाचित्रांसह दस्तऐवजीकरण करण्याचे निर्देशही देण्यात आले. दुर्गम व अतिदुर्गम भागातील आश्रमशाळांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळल्यास जबाबदारी निश्चित :-

आश्रमशाळांच्या परिसरातील गवत, झुडपे व अस्वच्छता नियमितपणे दूर करणे, आवश्यक ठिकाणी कीटकप्रतिबंधक जाळ्या बसविणे, विद्यार्थ्यांना स्वच्छ अंथरुण-पांघरुण व सुरक्षित निवास उपलब्ध करून देणे, तसेच शुद्ध पाणी व दर्जेदार भोजनाची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले.

दरम्यान, आश्रमशाळांमध्ये प्रवेशित आणि प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ पडताळणी करून त्याचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सलग तीन दिवसांपेक्षा अधिक काळ गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

“विद्यार्थी हा संपूर्ण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा, आरोग्य, शिक्षण आणि सन्मानाची जबाबदारी आपली आहे. कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा मंत्री डॉ. उईके यांनी दिला.

मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचे सांत्वन :-

पाहणीनंतर मंत्री डॉ. उईके यांनी धानोरा विश्रामगृह येथे सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या अनु गाजुर कोरेटी हिच्या माता-पित्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शासन कुटुंबाच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत कुटुंबाला पात्रतेनुसार शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

त्यानंतर त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचारासाठी दाखल असलेल्या बाधित विद्यार्थिनींची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. विद्यार्थिनींना आवश्यक वैद्यकीय उपचार व सुविधा देण्यात कोणतीही कसूर होऊ नये, असे निर्देश त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह प्रकल्प अधिकारी आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular