Tuesday, July 28, 2026
HomeEtapalliएटापल्लीत स्वयंपाकी-मदतनीसांवर अन्याय...

एटापल्लीत स्वयंपाकी-मदतनीसांवर अन्याय…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

४ तासांच्या नियमाच्या सक्त अंमलबजावणीची CPI ची मागणी,

गडचिरोली/एटापल्ली,१६ जुलै २०२६::- एटापल्ली तालुक्यातील शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी व मदतनीस यांच्याकडून शासन नियमांना डावलून अतिरिक्त कामे करून घेतली जात असल्याचा गंभीर आरोप कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) ने केला आहे. या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती एटापल्ली यांना निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शासनाच्या दि. १८ डिसेंबर २०२३ रोजीच्या निर्णयानुसार स्वयंपाकी व मदतनीस यांची दैनिक कामाची मर्यादा ४ तास निश्चित करण्यात आली असून या कालावधीत केवळ विद्यार्थ्यांसाठी आहार तयार करणे, त्याचे वितरण आणि त्यासंबंधित कामेच अपेक्षित आहेत. मात्र तालुक्यातील अनेक शाळांमध्ये या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप CPI ने केला आहे.

निवेदनानुसार संबंधित कर्मचाऱ्यांकडून शाळा उघडणे-बंद करणे, कार्यालयीन कामे, संपूर्ण शाळेची साफसफाई, झाडू मारणे तसेच शिक्षक व प्रशासनाशी संबंधित विविध कामे करून घेतली जात आहेत. इतकेच नव्हे तर चार तासांची कामाची वेळ पूर्ण झाल्यानंतरही त्यांना शाळेत विनाकारण थांबवले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ही बाब शासन निर्णयाच्या विरोधात असून स्वयंपाकी-मदतनीसांच्या हक्कांवर गदा आणणारी असल्याचे CPI ने स्पष्ट केले.

याप्रकरणी सर्व शाळांना तात्काळ लेखी आदेश देऊन ४ तास कामाचा नियम कडकपणे लागू करावा, अतिरिक्त कामांवर बंदी घालावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करावी तसेच शासन निर्णयाचे पालन न करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी CPI ने केली आहे.

यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार (जिल्हा सहसचिव, भाकप) म्हणाले, “स्वयंपाकी व मदतनीस अत्यल्प मानधनावर सेवा देत आहेत. त्यांच्यावर होणारा अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास CPI च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

निवेदन देताना कॉ. सुरज जक्कुलवार (जिल्हा सदस्य), कॉ. जुबेदा शेख, कॉ. गीता पदा, कॉ. गीता दासरवार यांच्यासह अनेक स्वयंपाकी-मदतनीस, CPI कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular