Tuesday, July 28, 2026
HomeAramoriबांधकाम कामगारांची १०० टक्के नोंदणी करा...

बांधकाम कामगारांची १०० टक्के नोंदणी करा…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

प्रत्येक पात्र कामगाराला योजनांचा लाभ मिळालाच पाहिजे – आ. रामदासजी मसराम,

गडचिरोली/आरमोरी, २१ जुलै २०२६::- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र, गडचिरोली यांच्या वतीने पंचायत समिती येथे आयोजित आढावा बैठकीत आमदार रामदासजी मसराम यांनी बांधकाम क्षेत्रातील पात्र कामगारांची शंभर टक्के नोंदणी करून शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

गटविकास अधिकारी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत आमदार मसराम यांनी सांगितले की, बांधकाम क्षेत्रात किमान ९० दिवस काम केलेल्या प्रत्येक पात्र कामगाराची ऑनलाइन नोंदणी करण्यात यावी. नोंदणीकृत कामगारांना शिक्षण, आरोग्य, प्रसूती सहाय्य, सुरक्षा साहित्य, घरकुल, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, विवाह सहाय्य, पेन्शन, अपघात विमा तसेच मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी.

यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, दगड फोडणे, लादी-टाईल्स बसविणे, सुतारकाम, रंगकाम, गटार व नळजोडणी, विद्युत वायरिंग, अग्निशमन व वातानुकूलन यंत्रणा, लिफ्ट, सुरक्षा दरवाजे, लोखंडी ग्रिल, जलसंचयन संरचना, अंतर्गत सजावट, काचकाम, सौर उपकरणे, मॉड्युलर किचन, सिमेंट काँक्रिट वस्तू, जलतरण तलाव, सार्वजनिक उद्याने, पदपथ, बसथांबे, कारंजे तसेच इमारत व पायाभूत सुविधांशी संबंधित विविध कामांमध्ये कार्यरत असलेले कामगार मंडळाच्या योजनांसाठी पात्र आहेत.

सरकारी बांधकाम अधिकारी कुलदीप भोलाने यांना निर्देश देताना आमदार मसराम यांनी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश दिले. नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करून एकही पात्र बांधकाम कामगार शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी अधोरेखित केले.

बैठकीस गटविकास अधिकारी रविंद्र भाबड (देसाईगंज), राजेश फाये (कोरची), धीरज पाटील (कुरखेडा), मंगेश आरेवार (आरमोरी), सरकारी बांधकाम विभागाचे लिपिक कांबळे, परशुराम ठाकरे, तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा व कोरची तालुक्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. बैठकीत बांधकाम कामगारांच्या नोंदणीचा आढावा घेऊन विविध कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular