VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
बदलीनंतरही कारवाईची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन,
गडचिरोली ,०३ ऑगस्ट २०२६::- सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २, गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना गडचिरोलीत पुन्हा कोणतीही पदस्थापना देऊ नये, अशी मागणी छत्रपती सेना गडचिरोलीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंद कात्रटवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सुरेश साखरवाडे हे मागील आठ वर्षांपासून गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असून या काळात विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. कोरची तालुक्यातील नाडेकल मार्गावरील पूल वाहतुकीस सुरू होण्यापूर्वीच कोसळल्याच्या प्रकरणासह, हजारो निविदा नियमबाह्य पद्धतीने ऑफलाईन काढल्याचा तसेच रस्ते व पूल दुरुस्तीच्या कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणांवर अनेकदा आंदोलने करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करून जिल्ह्याबाहेर हटविण्याची मागणीही यापूर्वी करण्यात आली होती. तसेच हे प्रकरण राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही उपस्थित करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, शासनाने २१ जुलै २०२६ रोजीच्या आदेशानुसार सुरेश साखरवाडे यांची पदोन्नती करून नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील नगर परिषद प्रशासन संचालनालयात अधीक्षक अभियंता म्हणून बदली केली आहे. मात्र, बदली आदेशानंतरही त्यांनी अद्याप नवीन पदाचा कार्यभार स्वीकारलेला नसून गडचिरोलीतच राहण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अरविंद कात्रटवार यांनी केला आहे.
भ्रष्टाचारातून मिळविलेल्या पैशाच्या बळावर काही वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पुन्हा गडचिरोलीत पदस्थापना मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्याला पुन्हा गडचिरोलीत स्थान देऊ नये, अन्यथा अधीक्षक अभियंता कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ कार्यालयाला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
सदर निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्यमंत्री, सहपालकमंत्री, स्थानिक आमदार-खासदार, मुख्य अभियंता, जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
