Monday, August 3, 2026
HomeAheriअहेरी शहरातील मोकाट जनावरांच्या समस्येला दिलासा...

अहेरी शहरातील मोकाट जनावरांच्या समस्येला दिलासा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

तात्पुरत्या कोंडवाड्यासाठी जुने तहसील कार्यालयाची जागा उपलब्ध,

नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्या पाठपुराव्याला यश,

गडचिरोली /अहेरी,०३ ऑगस्ट २०२६::- अहेरी शहरात मोकाट जनावरांच्या वाढत्या समस्येमुळे नागरिक, वाहनचालक, व्यापारी आणि पादचारी त्रस्त झाले होते. शेतीचा हंगाम सुरू झाल्याने बहुतांश शेतांभोवती तारकुंपण उभारण्यात आल्यामुळे जनावरे शहराकडे वळली असून मुख्य रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांचा मोठा वावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी नगरपंचायतीने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्याकडे केली होती.

नागरिकांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेत नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी नुकत्याच झालेल्या अहेरी नगरपंचायतीच्या विशेष सभेत मोकाट जनावरांसाठी तातडीने कोंडवाड्याची व्यवस्था करण्याची जोरदार मागणी केली. मात्र, नगरपंचायतीकडे प्रभाग क्रमांक ७ मध्ये ग्रामपंचायत काळातील एक लहान कोंडवाडा उपलब्ध असल्याने तो अपुरा ठरत असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी अहेरीचे उपविभागीय अधिकारी अजय पिसाळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. जुने तहसील कार्यालय परिसरातील (कोर्टाच्या बाजूची) प्रशस्त जागा तात्पुरत्या कोंडवाड्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

या मागणीची तातडीने दखल घेत उपविभागीय अधिकारी अजय पिसाळ यांनी संबंधित जागा उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्र जारी केले आहे. त्यानुसार अहेरी नगरपंचायतीने त्या ठिकाणी विस्तीर्ण तात्पुरता कोंडवाडा सुरू करण्याची प्रक्रिया हाती घेतली असून ती लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

या निर्णयामुळे अहेरी शहरातील मोकाट जनावरांच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिक, व्यापारी आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular