VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/अहेरी,०६ ऑगस्ट २०२६::- गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३-सीच्या अत्यंत दयनीय अवस्थेविरोधात नागरिकांनी गुरुवारी अनोख्या पद्धतीने शासनाचा निषेध नोंदवला. रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे अयोग्य ठरल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी महामार्गाला ‘मृत घोषित’ करून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
महामार्गावरील मोठमोठे खड्डे, उखडलेला रस्ता आणि वारंवार होणारे अपघात यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून दुरुस्ती व पूर्णत्वाच्या आश्वासनांनंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी महामार्गाचे प्रतीकात्मक अंत्यसंस्कार करून शासन आणि संबंधित यंत्रणांच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केला. या अनोख्या आंदोलनामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात या विषयाची जोरदार चर्चा रंगली असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन महामार्गाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व मा. आयुषभाऊ मामीडवार आणि मा. योगेशभाऊ कोतकोंडावार यांनी केले. यावेळी गणेश मडपल्लीवार आणि शिवनाम सिडाम यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ता उपलब्ध करून दिला नाही, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल.
