VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
माजी आमदार डॉ. देवराव होळींची आश्रमशाळेला भेट; मृत विद्यार्थिनींच्या पालकांचे सांत्वन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाशी चर्चा,
गडचिरोली/धानोरा,११ ऑगस्ट २०२६::- धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील खासगी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. या गंभीर घटनेची दखल घेत भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मंगळवारी जपतलाई येथील आश्रमशाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी डॉ. होळी यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांशी संवाद साधून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांप्रति त्यांनी दुःख व्यक्त करत त्यांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी संबंधित कुटुंबीयांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर विशेष भर :-
आश्रमशाळेच्या पाहणीदरम्यान आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त आरुषी सिंग आणि प्रकल्प अधिकारी एम. अरुण यांच्यासोबत डॉ. होळी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह आश्रमशाळांमधील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली.
आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, पौष्टिक भोजन, आरोग्य सुविधा, वीज व्यवस्था तसेच सुरक्षित शालेय परिसर उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
“आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षणासाठी आश्रमशाळांमध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. भविष्यात जपतलाईसारखी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी भूमिका डॉ. देवराव होळी यांनी मांडली.
धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रालाही भेट :-
यानंतर डॉ. होळी यांनी धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन मृत विद्यार्थिनींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शोकाकुल पालकांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होत संवेदना व्यक्त केल्या.
घटनेची योग्य व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर आवश्यक ती कार्यवाही करावी, तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
“विद्यार्थ्यांचे जीवन आणि सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची आहे. प्रत्येक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित, आरोग्यदायी आणि दर्जेदार वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे डॉ. होळी यांनी स्पष्ट केले.
