VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
SIR नंतर नाव, पत्ता, वय, लिंगाच्या तपशिलांत त्रुटी; संतोष मद्दीवार यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन,
गडचिरोली /अहेरी, 04 सप्टेंबर 2026::- SIR प्रक्रियेनंतर प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीमध्ये अनेक मतदारांच्या नावांसह पत्ता, वय, लिंग तसेच इतर तपशिलांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून येत असल्याने त्या तातडीने दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी अहेरीचे उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ यांना निवेदन सादर केले.
SIR प्रक्रियेनंतर मतदार यादी अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू असली तरी अनेक मतदारांनी अद्याप आपल्या नावासह यादीतील इतर तपशील तपासलेले नाहीत. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील अल्पशिक्षित नागरिकांना मतदार यादीत नाव कसे तपासावे आणि त्रुटी आढळल्यास ती दुरुस्त करण्याची प्रक्रिया काय आहे, याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे मद्दीवार यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले.
ऑनलाइन सुविधेसोबत प्रत्यक्ष मार्गदर्शनाची गरज :-
मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी केवळ ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देणे पुरेसे नसून गावागावांत विशेष शिबिरे आयोजित करून नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला आपले नाव, पत्ता, वय, लिंग व अन्य तपशील तपासता यावेत तसेच चुका आढळल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
मतदार यादीतील माहिती अचूक असणे ही लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्रुटी वेळीच दुरुस्त न झाल्यास भविष्यात नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन विशेष मतदार यादी दुरुस्ती अभियान राबवावे, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.
यावेळी भाजप अहेरी तालुकाध्यक्ष विकास तोडसाम, श्रीनिवास मगडीवार, अजय ठाकरे, सिद्धेश सिडाम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
