Wednesday, November 4, 2026
HomeGadchiroliदर्शनी मालच्या घनकचरा शेड बांधकामावरून आर्थिक अनियमिततेचे आरोप...

दर्शनी मालच्या घनकचरा शेड बांधकामावरून आर्थिक अनियमिततेचे आरोप…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

अपूर्ण कामासाठी ₹१.५२ लाखांचा निधी खर्च केल्याचा गावकऱ्यांचा दावा,

माजी सरपंचांविरुद्ध FIR व रक्कम व्याजासहित वसुलीची मागणी,

गडचिरोली, 18 सप्टेंबर बातमी 2026::- गट ग्रामपंचायत दर्शनी माल येथे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ODF+ Model साठी मंजूर करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन शेडच्या बांधकामावरून आर्थिक अनियमितता व शासकीय निधीच्या गैरवापराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच ₹१ लाख ५२ हजार ४२२ रुपयांची शासकीय रक्कम व्याजासहित वसूल करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. आमदार कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांच्या कर्तव्य कक्ष क्र. १ मधील स्वीय सहायक पंकजभाऊ सोमणकर यांनी निवेदन स्वीकारले.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दर्शनी माल येथे ODF+ Model अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन शेडसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मंजूर अंदाजपत्रकानुसार कचरा वर्गीकरण शेड, कंपोस्ट खड्डे, १६ कप्पे तसेच इतर आवश्यक बांधकामे करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्ष ठिकाणी मंजूर आराखड्यानुसार संपूर्ण काम झाले नसून अत्यल्प, अपूर्ण व निकृष्ट स्वरूपाचे बांधकाम करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

प्रत्यक्ष कामावर अंदाजे ₹३० ते ₹४० हजारांच्या आसपास खर्च झाल्याचे दिसत असताना, ₹१,५२,४२२ रुपयांची संपूर्ण रक्कम खर्च झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. काम पूर्ण झाले नसतानाही ते १०० टक्के पूर्ण झाल्याचे दर्शविणारी कागदपत्रे व निवेदने असल्याचा दावाही करण्यात आला असून, या कागदपत्रांची सत्यता प्रशासनाने तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या कामाच्या कालावधीत माजी सरपंच सौ. यशोदा इंद्रजित बोबाटे यांनी कामासंदर्भात दिलेल्या निवेदनांचाही चौकशीत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, संबंधितांवरील आरोपांची सत्यता अधिकृत चौकशी व उपलब्ध अभिलेखांच्या पडताळणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, पंचायत समितीच्या वतीने ११ नोव्हेंबर २०२५ रोजी जा.क्र. ३२६६/२०२५ अन्वये दर्शनी माल ग्रामपंचायतीला शेडमधील अपूर्ण काम पूर्ण करण्याबाबत पत्र देण्यात आल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे, संबंधित माजी सरपंचांनी हे काम २०२३ मध्येच पूर्ण झाल्याचे सांगितल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही बाबींची कागदपत्रांच्या आधारे चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान शेडचे नुकसान झाले नसून ते पूर्वीपासून ज्या स्थितीत होते, त्याच स्थितीत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेडची पूर्वीची व सध्याची स्थिती, उपलब्ध छायाचित्रे, मोजमाप पुस्तिका, देयके, काम पूर्णत्वाची कागदपत्रे आणि संबंधित अभिलेखांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

घनकचरा व्यवस्थापन शेडचे काम अपूर्ण राहिल्यामुळे दर्शनी माल गावाच्या ODF+ Model उद्दिष्टावर परिणाम झाला असून गावाला अपेक्षित दर्जा मिळण्यात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संबंधितांची जबाबदारी निश्चित करून लागू शासन निर्णय व कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यास ₹१,५२,४२२ रुपयांची रक्कम नियमानुसार व्याजासहित वसूल करून शासनाच्या तिजोरीत जमा करावी, तसेच दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी लोमेश कुळमेथे, धोंडूजी उडान (पोलीस पाटील), किसन उडान, सुधाकर वैरागडे, कालिदास शेरकी, महेश उडान, नितीन भोयर, अरुण वासेकर, उमाजी भोयर, आनंदराव पिपरे, मिथुन उडान, सुशांत उडान, संदीप जराते, राहुल भोयर, यश कुणघाडकर यांच्यासह समस्त गावकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular