VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
रक्तदान, आरोग्य तपासणी, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि रुग्णांना माणुसकीचा घास देण्याचा उपक्रम,
गडचिरोली, 19 सप्टेंबर 2026::- वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजसेवेच्या माध्यमातून साजरा करण्याचा संकल्प करत गडचिरोली शहरात विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी, गडचिरोली शहराच्या वतीने आयोजित या उपक्रमांतून सेवा, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात येणार आहे.
या उपक्रमांत रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच रुग्णालयातील रुग्णांसाठी माणुसकीचा घास अशा विविध सेवाभावी कार्यक्रमांचा समावेश आहे. समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ करणे, हा या आयोजनामागील उद्देश आहे.
विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांची रेलचेल :-
आयोजित कार्यक्रमांतर्गत जवाहरलाल नेहरू शाळा आणि राजीव गांधी शाळा परिसरात उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पंचवटी नगर येथील शिवमंदिर परिसरात रक्त तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.
लांजेडा येथील अंगणवाडीत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार असून, इंदिरा गांधी चौकातील स्टेट हाऊस येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात रुग्णांसाठी ‘माणुसकीचा घास’ हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहे.
आरोग्यसेवा आणि सामाजिक बांधिलकीवर भर :-
रक्तदानातून गरजू रुग्णांना मदत मिळावी, आरोग्य तपासणीच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याविषयी जागरूक करता यावे आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
विशेषतः रुग्णालयातील रुग्णांना अन्नदान करून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करण्याचा उपक्रम सामाजिक जिव्हाळ्याचे दर्शन घडविणारा ठरणार आहे.
‘सेवा, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी’ :-
वाढदिवसाचा आनंद समाजातील गरजू, विद्यार्थी आणि रुग्णांसोबत वाटून घेण्याची संकल्पना या आयोजनातून पुढे आली आहे. उत्सवाला समाजोपयोगी कार्याची जोड देत नागरिकांमध्ये सेवाभाव आणि सामाजिक सहभागाची भावना वाढीस लागावी, असा संदेश या उपक्रमांतून देण्यात येत आहे.
दरम्यान, या विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवसाचे औचित्य साधून समाजहिताचे कार्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
