Monday, September 28, 2026
HomeChamorshiचामोर्शीत पत्रकार भवन उभारण्यासाठी आमदारांकडे पत्रकार सेवा प्रतिष्ठानचे निवेदन...

चामोर्शीत पत्रकार भवन उभारण्यासाठी आमदारांकडे पत्रकार सेवा प्रतिष्ठानचे निवेदन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

पत्रकार परिषद, प्रशिक्षण शिबिरे व सामाजिक उपक्रमांसाठी स्वतंत्र जागेची मागणी; आमदार निधीतून आर्थिक तरतूद करण्याचे आवाहन,

गडचिरोली /चामोर्शी, 28 सप्टेंबर 2026::-चामोर्शी तालुका हा गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या तालुक्यांपैकी एक असून सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य तसेच विविध विकासात्मक घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तालुक्यातील विविध प्रश्नांना प्रशासन व शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पत्रकार सातत्याने कार्यरत असतात. मात्र, चामोर्शी येथे पत्रकारांसाठी स्वतंत्र व सुसज्ज पत्रकार भवन उपलब्ध नसल्याने पत्रकारांना विविध उपक्रमांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार सेवा प्रतिष्ठान, चामोर्शी यांच्या वतीने चामोर्शी येथे स्वतंत्र पत्रकार भवन उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना निवेदन सादर केले. पत्रकार समाजातील विविध प्रश्न, नागरिकांच्या अडचणी तसेच शासनाच्या योजना व प्रशासनाच्या कामकाजाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

चामोर्शीसारख्या मोठ्या तालुका मुख्यालयात आजही पत्रकारांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने पत्रकार परिषदा, बैठका, प्रशिक्षण शिबिरे, सामाजिक विषयांवरील चर्चा तसेच लोकहिताच्या उपक्रमांसाठी सुसज्ज पत्रकार भवनाची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिष्ठानने म्हटले आहे.

आमदार निधीतून आर्थिक तरतुदीची मागणी :-

चामोर्शी येथे सुसज्ज पत्रकार भवन उभारण्यासाठी आमदार निधीतून अथवा शासनाच्या संबंधित योजनेअंतर्गत आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पत्रकार भवनासाठी योग्य जागा उपलब्ध करून देतानाच पत्रकारांच्या विविध उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

“लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला सक्षम करण्यासाठी पत्रकार भवन ही काळाची गरज आहे,” अशी भूमिका पत्रकार सेवा प्रतिष्ठानने निवेदनातून मांडली आहे. आमदारांनी या मागणीची सकारात्मक दखल घेऊन पत्रकार भवन उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

यावेळी पत्रकार सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद खोबे, सचिव अरुण गव्हारे, कार्याध्यक्ष नितेश गट्टीवार , उपाध्यक्ष श्रावण वाकोडे, धनराज वासेकर, कोषाध्यक्ष मारोती बारसागडे, सहसचिव प्रफुल कोटांगले, सदस्य हस्ते भगत व पुंडलिक भांडेकर आदींच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर करण्यात आले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular