VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
चामोर्शी तालुक्यात पंचनाम्यांना वेग; धान-कापूस पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची माहिती संकलित,
गडचिरोली /चामोर्शी,01 ऑक्टोबर 2026::-महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त क्षेत्रामध्ये समाविष्ट केलेल्या चामोर्शी तालुक्यात आता दुष्काळी परिस्थितीतील पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग आला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने अधिकारी व कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पिकांची प्रत्यक्ष पाहणी करीत असून, नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे.

सहाय्यक कृषी अधिकारी प्रदीप मुंडे यांनी रविंद्रपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देत पिकांच्या स्थितीची पाहणी केली. त्यानंतर धर्मपूर येथील शेतांमध्ये जाऊन धान व कापूस पिकांची पाहणी करण्यात आली. पिकांवर झालेला परिणाम, पावसाची परिस्थिती आणि संभाव्य नुकसान याबाबत प्रत्यक्ष माहिती घेत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

यावेळी शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती देण्यात आली. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या विविध सवलती व मदतीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी प्रत्येक नुकसानग्रस्त शेताची प्रत्यक्ष पाहणी करून अचूक नोंद करण्यावर कृषी विभागाचा भर आहे. पिकांची सद्यस्थिती, पावसाचा परिणाम आणि संभाव्य नुकसान याची माहिती पंचनाम्याद्वारे संकलित केली जात आहे.

तालुक्यातील विविध गावांमध्ये पंचनाम्याचे काम सुरू असून ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून शेतांमध्ये प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे.
प्रत्येक नुकसानग्रस्त शेताची नोंद होण्याची अपेक्षा :-
दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरू केलेल्या पंचनाम्यांमुळे शेतकऱ्यांच्या शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तालुक्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये तसेच प्रत्यक्ष नुकसानीची योग्य नोंद करून शासनाकडे अहवाल सादर करावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
