VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पीक नुकसानीचा घेतला आढावा; महसूल व कृषी विभागाचे पथक सर्वेक्षणात व्यस्त,
गडचिरोली /चामोर्शी (जैरामपूर), 01 ऑक्टोबर 2026::-खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जैरामपूर परिसरात पीक नुकसानीचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाची उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची सद्यस्थिती तसेच पावसाअभावी झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.
जैरामपूर परिसरातील विविध शेतांमध्ये महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. शेतातील पिकांची वाढ, पावसाचे प्रमाण, पिकांवर झालेला परिणाम आणि प्रत्यक्ष नुकसानीची स्थिती याची पाहणी करून आवश्यक नोंदी घेतल्या जात आहेत. प्रशासनाच्या पथकाकडून प्रत्यक्ष बांधावर जाऊन सर्वेक्षण केले जात असल्याने नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती शासनाच्या निदर्शनास येण्यास मदत होणार आहे.
उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी सर्वेक्षण सुरू असलेल्या शेतांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षणाच्या कार्यवाहीची माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांकडूनही पिकांच्या नुकसानीबाबत माहिती जाणून घेतली. दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन सर्वेक्षणाची प्रक्रिया पारदर्शकपणे व अचूक पद्धतीने पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे यावेळी दिसून आले.
यावेळी संवर्गविकास अधिकारी प्रकाश पोळ, मंडळ अधिकारी नवनाथ अतकारे, ग्राम महसूल अधिकारी दिलीप पुंगाटी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी सोनी गावडे उपस्थित होते. संबंधित अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पीक नुकसानीची पाहणी करून सर्वेक्षणाची नोंदणी करीत होते.
दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची प्रत्यक्ष परिस्थिती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. पावसाअभावी पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम, अपेक्षित उत्पादनात होणारी घट आणि त्यातून निर्माण झालेली आर्थिक अडचण याबाबत शेतकऱ्यांनी माहिती दिली. प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीची योग्य पद्धतीने नोंद घ्यावी आणि शासनाच्या नियमानुसार पात्र शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
दुष्काळ सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष पीक नुकसानीची माहिती संकलित करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे जैरामपूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार असून, प्रशासनाच्या प्रत्यक्ष पाहणीमुळे सर्वेक्षण प्रक्रियेला अधिक गती मिळाली आहे.
