VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)
चामोर्शी,१२ ऑक्टोंबर २०२३ :: – वातावरणातील बदलामुळे डेंग्युचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने चामोर्शी शहरातील नागरीकांनी वेळीच खबरदारी घ्यावी व उपाययोजना कराव्यात असे आवाहन चामोर्शी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी केले आहे.
सद्यस्थितीत पावसाळा असल्याने छतावरील, अंगणातील साहित्यात पावसाचे पाणी साचून एडिस इजिप्ती डासाची पैदास होऊन घरातील व्यक्तीना डेंगूचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे जनतेने डेंग्यू होऊ नये यासाठी दर रविवारी कोरडा दिवस पाळावा. तीव्र ताप, अंगदुखी, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्याच्या मागे दुखणे, रक्तस्त्रावीत डेंग्यु तापामध्ये शरीरामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव अशी लक्षणे आढळतात. ही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकिय उपचार घ्यावा. डेंग्यू या रोगांचा प्रसार डासांमार्फत होतो. रोग दूषित व्यक्तीस डास चावल्यानंतर तो डास निरोगी व्यक्तीस चावल्यास या रोगांचा प्रसार होतो. डेंग्यू ताप या रोगाचा प्रसार एडीस एजिप्ती या डासामार्फत होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या व साठलेल्या स्वच्छ पाणीसाठे जसे हौद, सिमेंटची पाण्याची टाकी, रांजण, माठ, टायर्स, भंगार सामान, छतावरील साठलेले पाणी, कुलर, बाटली, बादल्या, नारळांच्या करवंट्या नळाचे खड्डे या ठिकाणी एक आठवड्यापेक्षा जास्त काळ पाणी साठून राहिल्यास होते.
यामुळे घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. आवश्यक तो एक आठवड्यापेक्षा जास्त काळ पाणी साठवून ठेवू नये, आठवड्यातून किमान एक वेळेस पाणीसाठे रिकामे करुन पुसून घेवून कोरडी करुन नंतरच पाणी भरावे.
टायर्स व निरुपयोगी, भंगार सामान घराबाहेर, छतावर ठेवू नये त्यामध्ये पावसाचे पाणी साठून राहून डासोत्पत्ती होते. या साहित्याची विल्हेवाट लावावी. झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा. वैयक्तिक संरक्षणासाठी डासांना पळवून लावणाऱ्या कॉईल, ओडोमास साधनांचा वापर करावा. नाली, गटारे वाहती ठेवावीत. जास्त काळ पाणी साठून राहत असल्यास त्यामध्ये जळालेले तेल, वंगण, केरोसीन टाकावे. तापाचा रुग्ण आढळून आल्यास त्यास तात्काळ दवाखान्यात उपचार याप्रमाणे उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यास डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यास मदत होईल असेही फागणेकर यांनी म्हटले आहे.
