VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव यांचे सहकार्य; डॉ. लुबना हकीम यांचे मार्गदर्शन,
गडचिरोली/अहेरी, २१ जुलै २०२५::- आज दिनांक 21 जुलै ला भगवंतराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अहेरी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत मलेरिया प्रतिबंध आणि तपासणी मोहिम राबविण्यात आली. शिबिरात डॉ. लुबना हकीम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मलेरियाच्या लक्षणांबाबत सखोल मार्गदर्शन केले आणि प्रत्यक्ष तपासणीही केली.
या उपक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली. प्रभात फेरीत महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आणि आरोग्य केंद्राचे कर्मचारी सहभागी झाले होते. फेरीच्या माध्यमातून मलेरिया, डेंग्यू, स्वच्छता आणि आजारांपासून बचाव याविषयी जनजागृती करण्यात आली.नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाचे कौतुक केले.

प्रभात फेरीनंतर महाविद्यालय परिसरातच आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांची मलेरिया तपासणी करण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभाग घेतला. तपासणीत कोणत्याही प्रकारचा संसर्ग आढळून आल्यास तत्काळ उपचार देण्यात येतील, असे डॉ. लुबना हकीम यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या आयोजनात प्राचार्य, शिक्षकवृंद, महाविद्यालय कर्मचारी व आरोग्य केंद्राच्या पथकाचे विशेष सहकार्य लाभले. शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनीही या आरोग्य उपक्रमाचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी आणि मलेरियाविषयी जनजागृती हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयी सजगता निर्माण होते. भविष्यातही असे उपक्रम राबविले जातील, असे आयोजकांनी सांगितले.
