VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
अप्पर आयुक्त, प्रकल्प अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी; शेतकरी कामगार पक्षाचा इशारा,
गडचिरोली /एटापल्ली,१३ ऑगस्ट २०२६::- जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत शेतकरी कामगार पक्षाने आदिवासी विकास विभागावर जोरदार टीका केली आहे. भामरागड प्रकल्पांतर्गत एकाही आश्रमशाळेला अद्याप बेडचा पुरवठा झालेला नसल्याचा दावा पक्षाने केला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. तसेच अप्पर आयुक्त व प्रकल्प अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी केली आहे.

याशिवाय अनेक आश्रमशाळांमध्ये कर्मचारीवर्ग अपुरा असून, काही ठिकाणी महिला अधीक्षक वगळता महिला कर्मचारी तसेच महिला शिक्षिकांचीही कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नसणे आणि मच्छरदाण्यांचा तुटवडा असणे, ही गंभीर बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. बेड नसल्यामुळे मच्छरदाण्यांचाही उपयोग करता येत नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

“आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुरक्षित वातावरण देण्यास शासन अपयशी ठरत आहे. मोठ्या बजेटनंतरही मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसतील तर निधीचा नेमका वापर कुठे होतो?” असा सवाल भाई रामदास जराते यांनी उपस्थित केला.

जपतलाई आश्रमशाळेला वर्षानुवर्षे अनुदान देण्यात आले, तर तेथील मूलभूत सुविधांची पूर्तता झाली की नाही, याची जबाबदारी प्रकल्प अधिकारी व अप्पर आयुक्तांची नव्हती का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष होत राहिल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मुंबईतील संबंधित मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाई रामदास जराते यांनी दिला आहे.

जपतलाई प्रकरणात शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेताना राजकीय हस्तक्षेप न करता जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांची वस्तुनिष्ठ तपासणी करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागण्यांना भाई शामसुंदर उराडे, डॉ. गुरुदास सेमस्कर, जयश्रीताई वेळदा, भाई अक्षय कोसनकर, रमेश चौखुंडे, प्रभाकर गव्हारे, डंबाजी भोयर, दामोदर रोहणकर, अशोक किरंगे, पांडुरंग गव्हारे, तुळशिदास भैसारे, राजू केळझरकर, चिरंजीव पेंदाम, चंद्रकांत भोयर, योगेश चापले, कविता ठाकरे, सोनाली कवडो, रोहिणी उईके, कविता मेश्राम, संगिता चांदेकर आदींनी समर्थन दिले.
